शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

आठवेल का तुला?

कधीतरी मागे वळुन बघ आठवेल तुला काही
गेलेल्या क्षणांना हि पकडून ठेव सापडेल तुला काही

आठवेल का तुला आपलं पहिलं भेटणं
छोटयाश्या गोष्टीवरुन कडाक्याचं भांडणं होणं

मग काही ना काही कारणानं भेटत जाणं
कित्येक भेटीनंतर आपलं मन जुळणं

आठवेल का तुला गुलाबाचं फुल देताना सुटलेला कंप
तुझ्या हि चेहरयाचा त्यावेळी उडाला होता रंग

दुसरयाच क्षणी मात्र मनात कारंजे उडाले होते
तुझ्या हि गालावर असंख्य गुलाब फुलले होते

तु म्हणाली होतीस,फुलाची गरज नाहिये मला
हातात फक्त तुझा हात दे मला

आठवेल का तुला समुद्रात पाय पसरुन बसलेलं
लाटा चुकवुन वाळुचं घर बांधलेलं

आकाश्यातल्या चांदण्या मोजण्याची चढाओढ आठवेल का तुला
वारयांशी लावलेली पैज आठवेल का तुला

अन्‌ हातात हात घालुन उन्हांत चांदणं शोधायचो ते
रात्रीच्या अंधारात आयुष्याची स्वप्नं पाहयचो ते

आठवेल का तुला पोट धरुन हसताना डोळयांत पाणी यायचं
आणि डोळयांत पाणी आले असताना एकमेकाना हसवायचं

आठवेल का तुला आपलं ते जगणं
"मेड फॉर इच ऑदर" म्हणुन मित्रांचं चिडवणं

एवढं सगळं आठवताना मी आठवेन का तुला??
का जाणीवपुर्वक विसरुन जाशील तु मला???




माझ्या आईच्या डायरीतुन

इ-प्रसारणवर आपली आवड लागले होते."अशी ही बनवाबनवी" मधील "कुणी तरी येणार ग,पाहुणा घरी येणार ग"घे गाणे चालु येते.अन्‌ मी माझ्या हि नकळत लक्ष देऊन ऎकु लागले.

"कोणी असो तो किंवा ती, फरक तुला सांग पडतो किती?
शेवटी आई तु ,अग आई तु होणार ग, शेवटी आई तु होणार ग"

ऎकताना अंगावर रोमांच उभं राहिलं.खरंच किती सत्य आहे, आई होणे किती सुंदर आहे.पण हे जेवढं सुंदर आहे, तेवढं सहज नाही, किंबहुना सहज नाही म्हणुनच ते सुंदर आहे.मुलाला जन्म देणे,त्याला एक आकार, रुप देणॆ ,या जगाच्या लायक बनवणे हे सगळं करताना आई-वडिलांना खुप काही करावे लागते,झेलावे लागते,भोगावे लागते.आणि शेवटी पिल्लाविना घरटे पोरके होतं,ती गोष्ट वेगळीच.


आज या ब्लॉगच्या निमीत्ताने मला काही माझ्या आईबद्दल बोलायचे आहे, तिच्याबद्दल, तिच्यासाठी लिहीयचं आहे,तिच्याच डायरीतुन...
~~~~~


आज लेकीला पोचवायला मी विमानतळावर आले होते.नवरयाबरोबर ती अमेरिकेला चालली होती.दुरदेशी जाणार म्हणुन तिची उडालेली त्रेधातिरपीट,घाई,पोचवायला आलेल्यांच्या शुभेच्छा,सतत वाजणारे फोन,सामानाची आवराआवर ,चाललेली लगबग पाहुन माझ्या डोळयांत टचकन‌ पाणी आले.डोळे पुसताना मुलीने पाहिले,जवळ आली"कशाला ग रडतेस ,मम्मी?असं का करतेस? लांब थोडीच जात आहे. अग,सगळं जग आता किती जवळ आलय़ं.हवे तेव्हा फोन उचला ,न्‌ बोला.आणि आम्ही तर ३ महिन्यांसाठीच चाललोय.आता जातील बघ ३ महिने.डोळे पुस ना आता!" वॆडॆ,मी रडतेय कुठेय?माझी लेक आज गगनभरारी घेतेय नि माझ्या डोळयांत अश्रु?नाही ग,आनंदाने डोळे भरुन आले.तुमच्या सारख्या मुली माझ्या पोटी जन्मल्या म्हणुन देवांचे आभार मानतेय."

डोळे आवरले,पण मनाला कोणी आवरु शकलयं का?

माझं बालपण एका कॄष्णाकाठच्या लहानश्या गावात गेल.कृष्णामाईची कृपा नि गावकरयांचे कष्ट यांमुळे गाव खाऊन-पिऊन सुखी होते,समाधानी होते.

आमचं एकत्र कुटुंब होते.त्यामुळे घरात माणसांना तोटा नव्हता. मला ६ चुलते होते.त्यामुळे सख्खी-चुलत अशी १९-२० भावंडे होतो आम्ही.घरात बायका खुप असल्याने कधी स्वयंपाकघराची कामे आमच्या वाटणीला यायची नाहीत.नाही म्हणायला नदीवरुन पाणी आणणे, लहान भावडांना सांभाळणॆ अशीच आमची कामे. बाकीचा दिवस उनाडक्या करण्यात, दंगा घालण्यात जायचा.

मला शिक्षणाची भारी हौस.त्याकाळी मुलींना जास्त कोणी शिकवत नसे.तसेच आमचं घर हि आडवळणी,मळयात असल्याने गावात जायचं म्हणजे शेतातुन जावं लागे,त्यामुळे मुली सहसा बाहेर जात नसत.पुन्हा पाठच्या भावंडाना कोण बघणार हा हि प्रश्न होताच.

शाळेतले शिक्षक घरी येउन खुप समजावुन गेले,मुलांना शाळेत घाला म्हणुन.अन्‌ शेवटी नाईलाज म्हणुन का होईना पण आम्ही शाळेत जाऊ लागलो,आमच्या लहान भावडांना काखेत मारुन.वयात येऊपर्यत शाळेला जायची परवानगी मिळाली होती आम्हांला.

माझ्या लहान भावाला घेऊन मी शाळेत जायची कारण त्याला सांभाळायला कोणीच घरे नसे, सगळे शेतावर जात.त्याकाळी तसे चालायचे.तो कधी-कधी शाळेत शी पण करायचा पण ते सगळं मला मान्य होतं कारण मला शाळेला जायला मिळतं होतं.अजुनही मला सर्व जसेच्या तसं आठवतयं.शाळेतले गुरुजी,प्रार्थना,धडे,कविता,पुस्तके,मैत्रिणी न्‌ सर्व.शाळेत उशीरा जायला लागल्यामुळे मी तशी वर्गात मोठी होती.माझा पहिला नंबर असायचा वर्गात नेहमी.मी पत्रे खुप छान लिहायची. वरच्या वर्गातील मुली येऊन माझ्याकडुन गणिते,पत्रे लिहुन घेत.गुरुजी ही माझ्यावर खुष असत.आणि मी हि शाळेवर.

मी न्‌ माझी आतेबहिण ,आमची दोघांची जोडी होती.नदीवरुन पाणी आणताना आम्ही मोठ-मोठयांने कविता,पाढे, धडे वगैरे म्हणायचो.सगळे तोंडपाठ असायचे.मला शिकण्याची खुप इच्छा होती. मी मोठेपणी शिक्षिका व्हायचे ठरवले होते.

ठरवलेले,उरी बाळगलेले सगळेच सत्यात उतरतंच असं नाही.माझं ही तसेच झाले.पाचवीत असताना मला शाळा सोडवी लागली.गुरुजींनी घरी येऊन सांगितले,"मुलगी हुशार आहे ,पाठवा शाळेत.तिचं नुकसान करु नका".पण नाही,कोणीच बधले नाहीत.माझ्या आजीचे ठाम मत ,न्हात्या-धुत्या मुलीला मी पाठवणार नाही.

वयाच्या १७ वर्षी लग्न झालं.लग्नासाठी वडिलांकडे पैसा नाही,त्यात आम्ही ४ बहिणी.कोणाला म्हणुन खर्च करणार.माझा नवरा शिक्षक होता,म्हणुन मी मागचा-पुढचा विचार न करता तयार झाले.आशा होती,देव संधी देतोय.नक्कीच हा ’मला’ जाणेल नि मला पुढे शिकता येईल.वेडया मनाने "दोघांची सर्व्हीस,सुटसुटीत घर" असंही स्वप्न पाहिले.आणि पुन्हा एकदा माझं स्वप्न मोडलं.

लग्नानंतर मी यथावकाशाने नवरयाजवळ मनीची इच्छा व्यक्त केली.पण त्यांना लग्नानंतर शिक्षण ही गोष्ट पटली नाही.त्यात ते कोकणातले छोटे गाव.लोकं काय म्हणतील हा हि प्रश्न होताच.पण मी जिद्द सोडली नाही.त्यातच पहिल्या मुलीचा जन्म झाला.त्यादरम्यान ह्यांना हि बी.एड्‌. साठी जावे लागले.

अशीच काही वर्षं निघुन गेली.मध्ये दुसऱ्य़ा,तिसऱ्य़ा मुलींचा हि जन्म झाला.माझी लहान मुलगी १-१.५ वर्षाची झाली न्‌ मनातील ती सुप्त इच्छा पुन्हा वर आली.पुन्हा मी ह्यांच्या मागे टुमणे लावले.अन्‌ मी चक्क दहावीच्या परीक्षेला बसले.पाचवीनंतर मध्ये ५-६ वर्षाचा फरक पडल्यामुळे दहावीला बसायला मला परवानगी मिळाली.तिन्ही मुलींना सांभाळुन,लोकांच्या टोमण्याला न दाद देता मी तयारीला लागले.सायन्स प्रक्टिकल,भुमिती,गणित,संस्कृत,इंग्लिश हे सगळं नवीन होते,अवघड होतं माझ्यासाठी.ह्यांच्या मदतीने,काही दहावीच्या विद्यार्थीं मुळे सगळे पार पडले नि मी ६०% नी दहावी पास झाले.

दिशा सापडली होती,वाटचाल हि चालु होती माझी. डी.एड्‌.साठी प्रवेश घ्यायचा होता.लहान मुलांना घेऊन शिकायला मी तयार होते.पण जवळच्या ठिकाणी घ्यायचे तर डोनेशन भरावे लागते होते.आमची तेवढी तयारी नव्हती.त्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करायचे म्हणुन ठरवुन गप्प बसलो.

पण विधीलिखीत काही वेगळंच होते.त्या पुढच्या वर्षीपासुन दहावीनंतर डी.एड्‌.बंद होऊन बारावीनंतर झाले.आणि माझ्या शिक्षणाला पुर्णविराम मिळाला नि माझ्या इच्छेला सुध्दा...

ह्या सगळ्यात सांसरिक, वैयक्तिक अडचणी चालुच होत्या.सासरकडुन होणारा त्रास,मान-अपमान हे सगळं झेललं. मन दुखावले तरी त्याला सावरलं.कुणाला सांगुन ही कळणार नाहीत एवढं मनाचे हाल झालेत.एक वेळ शरीराचे हाल परवडतात पण मन दुखावले कि त्याला बरे व्हायला वेळ लागतो बराच.

त्यानंतर ही मी काही ना काही करत सतत धडपडत राहिले.शिवणकाम तर चालुच होते.पण त्याचे ही नवीन कोर्सेस,साक्षरता अभियान,पर्ल्स ग्रीन असं काही ना काही करत राहिले. काहितरी मला करायचे आहे,काही ना काही माझं असं कमवायचे आहे एवढीच इच्छा होती.

नंतर या सगळ्यांने थकुन,दमुन मी मला मुलगा पाहिजे असा हट्ट घेतला.केलेले ऒपरेशन रि-ओपन करुन मला लहान मुलीच्या पाठीवर १० वर्षांनी मुलगा झाला.

बघता बघता दिवस गेले, मुली मोठया झाल्या. लहानशा, काही सोयी नसलेल्या गावात राहुन शिकल्या.मोठी मुलगी बी.ए. झाली, मधली इंजिनीयर तर धाकटी बी.एस्सी. झाली. लग्न करुन सासरी निघुन गेल्या. आज त्याच्या डोळ्यांत मला माझं स्वप्न पुर्ण झाल्याचं दिसतयं!


आणि म्हणुन हे पाणी...आनंदाचे,समाधानाचे,कृतार्थाचे पाणी... आनंदाश्रु...!

बुधवार, २५ फेब्रुवारी, २००९

मला एकदा



मला एकदा मोगरयाचे फुल बनायचयं
गजरा होऊन तिच्या
वेणीत स्वतःला माळुन घ्यायचयं


मला एकदा झुळुक बनायचयं
गालाशी चाळा करणाऱ्या तिच्या
बटांना हळुच मागे सारायचयं

मला एकदा पाणी बनायचयं
तिच्या डोळयांच्या पापणीतुन
हळुच गालावर ओघळायचयं


मला एकदा मेघ बनायचयं
अचानक बरसुन तिला
अगदी चिंब भिजवायचयं

मला एकदा आरसा बनायचयं
तिला माझ्यात पाहताना
डोळॆ भरुन न्याहाळयचयं

मला एकदा सावली बनायचीय
आयुष्याभरासाठी तिला
साथ-सोबत करायचीयं



मीलन

वैशाख वणवा मी मी म्हणतं होता
धरित्रीच्या अंगाची काहिली वाढवतं होता
पशु-पक्षी झाडे,पाने सारेच होते त्रस्त
वरुणाराजाची करुणा भाकण्यात व्यस्त

आणि एक दिवस अचानक
वारा सगळ्यांना सांगत सुटला
सूर्य ही आडुन आडुन पाहु लागला
आसुसली धरती, न कण-कण मोहरला

ढगांच्या काळ्या रथात बसुन
विजेच्या रोषणाई, मेघांच्या वाजंत्रीसहित
आगमला वरुणराज,बरसला तो
सुखावली धरितीची गात्रं न गात्रं

पसरला सुगंध आसमंतात
ल्यायली ती एक नवा साज
सुखावले सारे , गेले विसावुनी
अंकुरले बीज तिच्या कुशीतुनी...

सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

ती समोर असली की

















ती समोर असली की
शब्द पाठमोरे होतात
सांगायचे खुप असले
तरी दिसेनासे होतात


पण आज मी ठरवले होते
तिला सर्व काही सांगायचेच
वेडया ह्या माझ्या मनाला
तिच्यासमोर मांडायचेचं


हसु नको पण मी
आरशासमोर राहुन तयारी ही केली होती
सुरुवात नि शेवट ची
पुन्हा पुन्हा उजळणी केली होती


सगळं काही आठवत असुन ही
मी गप्पच होतो
तिच्या जोरानं हालवण्याने
भानावर आलो होतो


ती माझ्याकडे बघत राहिली
न मी तिच्यात हरवलो
खोटं नाही बोलणार मी
पण पुन्हा सर्व विसरलो


ती च मग बोलली
निरव शांतता मोडत
तुझ्या मनात काय आहे
मला नाही का ते कळत???


तुझ्या मनातलं मी
कधीच वाचलं होतं
माझं मन ही नकळत
तुझं झालं होतं


मग मात्र मी
घेतला तिचा हाती हात
आयुष्याभरासाठी द्यायची
ठरवली एकमेकांना साथ


आता मात्र मला
सर्व काही आठवले
ती समोर असली तरी
आपसुकच सुचत गेले