मंगळवार, २ जून, २००९

काही चारोळया


यु.स. मध्ये आल्यावर मी काय केले असेन तर पहिले मायबोलीवर साईन-इन केले...नंतर मग मायबोलीच मला लळाच लागला...हळुहळु मग तिथे लिहायला सुरुवात केली......
मायबोली वर खुप मातब्बर मंडळी आहेत...नी ऑर्कुटवर आमच्यासराखे नवोदित..त्यामुळे ऑर्कुटवर जास्त लिहिले गेले....एकमेकांना उत्तर चारोळी,कविता ह्या माध्यमांतुन दिली जाऊ लागली.त्यामुळे ह्या सगळयात माझे मन रमु लागले...दुर देशी वाटणारा एकाकीपणा गळुन पडला...

अश्याच ह्या न्‌ त्या कारणाने लिहिलेल्या काही चारोळया मी इथे एकत्र करत आहे....तुम्हांला आवडतील अशी आशा करते...

धन्यवाद....

~~~~~

तुला आठवायची मला
कधी गरज भासणार नाही
कारण तुला आठवायला
मी तुला विसरणारच नाही
~~~~~
काही क्षण असेच असतात
अळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखे
मोत्यासारखे भासणारे पण
क्षणात विस्कटुन जाणारे

~~~~~
पण क्षण हरवले तरी
आपण सावरायचे असते
मोत्यांसारख्या क्षणांना
मनाच्या आठवणींत साठवायचे असते
~~~~~
आठवणींच्या हिंदोळयांवर
मन हे वेडे झुले
कधी जमिनीवर तर कधी नभात
माझे न मलाच ठावे
~~~~~
आठवणींच्या हिंदोळयांवर
पुन्हा नाही झुलायचे
वळुन ही न पाहता
थेट मागे फिरायचे
~~~~~
पण आज पुन्हा एकदा फसलो
ठरवुन ही पुन्हा वाहवत गेलो
आठवणींचे थेंब मोजत बसलो
कोरडा असुन हि मी पुरता भिजलो....
~~~~~

माझे हे मन सुध्दा कधीच
तुझं झालं होतं
तुझं-माझं, माझं-तुझं
न करता तुझ्यात गुतलं होतं

असेन हि मी तुझ्या लेखी वेडी
पण तुझं मन मला कळलं होतं
तुझी नसेन झाली मी, पण
म्हणुन माझं प्रेम दुबळं नव्हतं

तुझ्यावरचं प्रेम नक्कीच खरं होतं
पण आई-वडिलांची माया,त्याचं प्रेम
त्याचे उपकार कशी मी विसरु
शक्य नव्हते मला ते

मला कळतय़ं, तुला मी दुखावलयं
माझ्याच मुळे आज दु:खी आहेस तु
तु माफ करावसं असे नाही मी म्हणणार
पण एकदा मात्र जरुर बघ माझ्याजागी तु
~~~~~
तुझी-माझी मैत्री
अशीच फुलावी
नात्याच्या वेलीवर
अविरत झुलावी
~~~~~

कुठेतरी अचानक झालेल्या ओळखीचे
मैत्रीत रुपांतर होते
जणु काही कळीपासुन
अलगद फुल उमलते

मग त्याचा सुगंध
आसमंतात पसरतो
मित्र-मैत्रिणींना
सुखावुन जातो

अशीच मग मैत्री
बहरत जाते
विश्वाच्या खांद्यावर
अगदी घट्ट विसावते
~~~~~
ओठाने बोलण्याआधी
माझे मन चहाडी करते
म्हणुन तर तिच्या डोळ्यांत
माझे प्रेम तराळते

~~~~~
पैसा कि प्रेम?

प्रेम न्‌ पैसा
नाण्याच्या दोन बाजु
व्यवहारी या जगात पैशाशिवाय पान ही हलत नाही
पण म्हणुन प्रेमाचं आस्तित्व नाकारुन चालणार नाही
दोन्ही ही गोष्टी तराजुत तोलायच्या ठरवल्या
पण प्रेमाची बरोबरी काही पैशाला जमेना
~~~~~
तुझ्या सोबत जगायचयं
म्हणुन तर क्षण मोजतेय
तुझ्यासोबत मरायचयं
म्हणुन तर स्वत:ला जगवतेय
~~~~~
स्पर्श

तु जवळ आलास की
असचं काहीसं होतं
बोलायचं खुप असलं तरी
सगळं कसं गप्प होतं

शांत राहुन तुला
अनुभववासं वाटतं
तुझ्या प्रत्येक श्वासात
आयुष्य जगावसं वाटतं

शब्दांपेक्षा मला स्पर्श
जवळचे वाटतात
म्हणुन तुझ्याशी बोलताना
शब्द तोकडे पडतात

बोलणं नाही झालं तरी
परपस्परांचे मन कळते
न्‌ म्हणुन कि काय
शब्दांचे घुटमळणे
मला नको वाटते
~~~~~