काव्यपुष्प लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काव्यपुष्प लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ८ मे, २००९

आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे !

आई, बहिण, सुन,लेक
प्रत्येक वळणावर एक नवं रुप
पण शेवटी ती एक स्त्रीच आहे
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

पुरुषांच्या वर्चस्वाखाली नेहमीच ती दबली
प्रसंगी पडली,रडली,पण धडपडुन उभी राहिली
आज ही तिची ही झुंज चालुच आहे
कधी आपल्या तर कधी परक्या माणसांविरुध्द आहे
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

तिनेच शिवबा घडवला, तीच होती श्यामची आई
तर कधी रणांगणावर समर्थपणे झुंजणारी लक्ष्मीबाई
अहिल्याबाई होळकर,ताराबाई असे तिचे अनेक दाखले
अंतराळात ही उमटवली तिने स्वत:ची पाऊले
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

खुपदा अन्याय, अपमान तिने गिळला
पण घरकुलाचं घरपण तिनेच राखलं
होणारया अत्याचाराला तिने रोखलं
प्रसंगी स्वत:ला बळी ही दिलं
स्वत:चं स्त्रीत्व तिनं जपलं
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

या जगांत नेहमीच ती दुय्यम ठरली
पण स्वत:च आस्तित्व तिने जगवलं
सुर्य नसेल ही ती कदाचित पण
काजवा मात्र नक्की आहे
अश्या हया स्त्रीचा मी ही एक अंश आहे
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

शनिवार, २५ एप्रिल, २००९

हिरकणी

खुप दिवसांनी लिहित आहे, मध्ये लिहायला जमले नाही...म्हणजे टाईप करुन पोस्ट करायला वेळ मिळाला नाही...

हिरकणी


वेडीवाकडी वळणे घेत डोंगरावरुन उतरणारी पायवाट
आणि मातीत मिसळणारी ती गोरी पाऊले
वेडयासारखी ती पळत होती
पिल्लासाठी कोणी एक माऊली आसुसली होती

तिला स्वत:चाच राग आला
तिच्या गरीबेचा,असहायतिचेचा
पण काय करणार बापडी
परिस्थितीपुढे तीच हतबल झालेली

आठवली तिला कुणीतरी सांगितलेली हिरकणी
पण पोटाची खळगी भरण्यासाठी
ती रोजच डोंगर चढायची
एकदाच नाही तर ,रोज रोज हिरकणी व्हायची

अंधार ही आता चांगलाच तरुण झाला होता
सगळया जगाचा त्याने जणु ताबा घेतला होता
पण तिला कसलीच तमा नव्हती
ना खाच-खळगे,दगड-धोंडे ,काटे-कुटयां ची भीती

वेशीजवळ येताच पाहिलं
कुणी एक वासरु गाईला लुचलेलं
तिचं काळीज अधिकचं ओलावलं
भरल्या पान्हानं ती तशीच सुटली
अगदी पळतच......





सोमवार, ६ एप्रिल, २००९

गाठोडे

पसारा आवरता आवरता
फडताळात सापडले एक गाठोडे
मनात मात्र जुन्या
आठवणींचे काहुर उठले

जुने-पुराणे फाटके,विटलेले
तरी हि जपलेले
गाठोडे उघडताच
मन कधीच त्यात शिरले

हा बापडा शालु
अजुन ही तसाच तलम
नव्या नवरीच्या अंगावर
अगदी दृष्ट लागण्याइतका खुलला होता
चमकले ओठांवर, आठवणींचे हसु
अन्‌ क्षणात डोळयांत झाले त्याचे आसु

ही शालजोडी त्यांच्या आवडीची
असंख्य प्रेमळ आठवणींची,करारीपणाची
भ्रताराची आठवण काळजात रुतली
जुन्या आठवणींवरची खपली निघाली
शेजारी कसलातरी भास झाला
अन्‌ आपसुकच पदर सावरला गेला

शेजारीच पडले होते पायमोजे
बाळाची चाहुल लागताच विणलेले
दुपटी,कुंची-टोपडी,लंगोटी
अजुन ही गंधित होती
गाठोडयाच्या एका कोपरयात
निरागसपणे पडली होती

हे लुगडं सासुबाईंनी दिले होतं
आवडले म्हणुन जे मी म्हटलें होते
कसरीने त्याला प्रेमाने जपलेले
माझं वेडं मन हेलावून गेले

छोटे छोटे फ्रॉक ,अंगरखे
ने अजुन ही बरेच काही
आपलाच हा हट्ट काही-बाही
सुना-नातवंडाना जपलेले द्यायची
काळानुरुप सगळे बदलत गेले
जुने सर्व काही गाठोडयात गेले

आवरायचं म्हणुन पसारा काढला
नि मन त्याने चाळवले
पसारा आवरला तरी मनाला
सावरणे जमलं नाही
मग पुन्हा मी तसेच गाठोडं बांधलं
अगदी त्यात न गुंतता...









मला एकदा जगायचयं...

माणसांच्या गर्दीमध्ये हरवलेल्या या दुनियेत
मला माझं आस्तित्व शोधायचयं
माझ्या जीवनाचं ध्येय समजावुन घ्यायचयं
थोडा वेळ निवांत बसुन मला स्वत: ला आजमावयचयं
मला एकदा जगायचयं...

मी कोण,काय करतेय,काय करायचयं?
कसे करणार आहे, कधी करणार आहे?
या प्रश्नांची मला उतारे हवीतं
सगळया गर्दीला सारुन मला अलिप्त राहायचयं
मला एकदा जगायचयं...

पक्ष्यांची किलबिल, झोंबणारा वारा
बाळाचे बोबडे बोल,पहिल्या पावसाचा सुगंध
कॊजागिरीचा चंद्र,मावळता सुर्य़
रोरावणारा समुद्र,झाडांचे धुमारे
सगळं नव्याने अनुभववायचयं,साठावचयं
मला एकदा जगायचयं...

पावसाचा थेंब बनुन तहानलेल्याला शमवायचयं
वटवृक्ष बनुन दमलेल्यांना विसावायचयं
सुर्यासारखा प्रकाश,चंद्राचा थंडावा द्यायचायं
इंद्रधनुष्याच्या रंगाने सगळयांना खुलवायचयं
दुसरयांना सुखावताना मला सुखावायचयं
मला एकदा जगायचयं....


स्वत:भोवती फिरणारया या जगांत
मला माझ्या वाटेवरुन चालायचयं
तुमच्यासारख्या मित्रांची साथ मिळावयचीयं
जे जे सुंदर आहे ते इतरांना दाखवायचयं
मला असं हे जीवन जगायचयं...
मला एकदा जगायचयं


मंगळवार, १७ मार्च, २००९

घालमेल

नुकताच "धुडगुस" पिक्चर पाहिला...टाईमपास होता, पण तिच्यावर बेतलेला प्रसंग नक्कीच जीवघेणा होता..ज्यांना अश्या प्रसंगाना तोंड द्यावे लागते,त्याची अवस्था कशी होत असेल ना??देव करो नि असे दु:ख कुणाच्याही वाटयाला न येवो...


दारामागे होणारी तिची
ती घालमेल
त्याला डोळयांत साठवताना
होणारी धडपड
तिची ही अवस्था समजत असेल का त्याला?


उंबरठयावरचे माप ओलांडुन
कालच ती घरात आली
अन्‌ आज तो निघाला
दुरदेशी प्रवासासाठी
तिच्या मनातली व्यथा उमजत असेल का त्याला?


सगळयांच्या गोंधळात नीटसा
निरोप ही देता आला नाही
"परत कधी येणार?’ हा
प्रश्न कंठातच विचारलाच नाही
तिची ही अस्वस्था जाणवत असेल का त्याला?

त्याच्या ही मनात
असेल का हे सारे
वळुन तिला पाहण्याचा
मोह कसा तो आवरे
स्व:ताच्या मनाला समजावणं जमत असेल का त्याला???

बुधवार, ४ मार्च, २००९

चित्र आयुष्याचं

एका मैत्रिणीच्या कवितेवरुन सुचलेली ही कविता....

आज म्हटलं आयुष्याचं चित्र रंगवु
जमतयं का ते पाहु
वाटलं सोपं असेल
रंगीबेरंगी रंगात उठुन हि दिसेल

प्रश्न पडला रंग कुठले घ्यावे
सगळेच का फक्त आवडते घ्यावे
वाटलं आवडीचेच निवडावे

मनातले चित्र प्रत्यक्षात उतरावे

पहिला रंग घेतला मायेचा
चित्रात भास जाणवला त्या उबेचा
म्हटलं छान आहे हा रंग
आयुष्य खुलुन येईल ह्याच्या संग

नंतर घेतला तो मैत्रीचा रंग
हा हा म्हणता रंगत गेला
बरयाच जागा रंगवुन हि तो शिल्लक खुप
आयुष्याला लाभले एक वेगळचं रुप

एक एक रंग आशेचा, सुखाचा, आनंदाचा घेतला
एकमेकांत मिसळुन एक नवीनच रंग तयार झाला
तरी हि चित्रात खुप जागा होती
कश्याची तरी कमी वाटत होती

मग घेतला प्रेमाचा नाजुक रंग
मऊ-मखमली असे झाले चित्राचे अंग
या रंगाने रंगवले एक क्षणच मात्र
आयुष्याला लाभला एक अर्थ

मग घेतला एक रंग यशाचा
एक रंग किर्तीचा, न्‌ एक आस्तित्वाचा
त्याने कळला उद्देश
या आयुष्याचा,या जगण्याचा


सगळं कसं छान दिसत होतं
तरीहि मन काहीसं खिन्न होतं
मग नावडते म्हणुन पडलेले रंग उचलेले
आता तरी चित्र पुर्ण होतेय का पाहिले

एक एक घेतला दु:खाचा, निराशेचा रंग
त्यात मिसळला अपयश ,पराजयाचा रंग
उरलेत्या जागा सर्व भरुन गेल्या
चित्रातले रितेपण संपवुन गेल्या

साधं चित्र रंगवायला हि
आपण वापरतो रंगसंगती
मग आयुष्यात संकट,निराशा
अपयशाची एवढी का भिती?

दु:खाशिवाय सुखाला मजा नाही
पराजयाशिवाय यशाला कोणी विचारणार नाही
निराशा आहे म्हणुन तर आशा जिवंत आहे
आसु आहे म्हणुन तर हासु ला किंमत आहे

म्हणुन आवडीचे-नावडीचे असे काही नसते
प्रत्येकाचं एक ठरलेलं ठिकाण असते
कुठला रंग कसा वापरायचं ते आपणच ठरवायचं
नि आयुष्य एकदम रंगीत,सुंदर करायचं ...






शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

आठवेल का तुला?

कधीतरी मागे वळुन बघ आठवेल तुला काही
गेलेल्या क्षणांना हि पकडून ठेव सापडेल तुला काही

आठवेल का तुला आपलं पहिलं भेटणं
छोटयाश्या गोष्टीवरुन कडाक्याचं भांडणं होणं

मग काही ना काही कारणानं भेटत जाणं
कित्येक भेटीनंतर आपलं मन जुळणं

आठवेल का तुला गुलाबाचं फुल देताना सुटलेला कंप
तुझ्या हि चेहरयाचा त्यावेळी उडाला होता रंग

दुसरयाच क्षणी मात्र मनात कारंजे उडाले होते
तुझ्या हि गालावर असंख्य गुलाब फुलले होते

तु म्हणाली होतीस,फुलाची गरज नाहिये मला
हातात फक्त तुझा हात दे मला

आठवेल का तुला समुद्रात पाय पसरुन बसलेलं
लाटा चुकवुन वाळुचं घर बांधलेलं

आकाश्यातल्या चांदण्या मोजण्याची चढाओढ आठवेल का तुला
वारयांशी लावलेली पैज आठवेल का तुला

अन्‌ हातात हात घालुन उन्हांत चांदणं शोधायचो ते
रात्रीच्या अंधारात आयुष्याची स्वप्नं पाहयचो ते

आठवेल का तुला पोट धरुन हसताना डोळयांत पाणी यायचं
आणि डोळयांत पाणी आले असताना एकमेकाना हसवायचं

आठवेल का तुला आपलं ते जगणं
"मेड फॉर इच ऑदर" म्हणुन मित्रांचं चिडवणं

एवढं सगळं आठवताना मी आठवेन का तुला??
का जाणीवपुर्वक विसरुन जाशील तु मला???




बुधवार, २५ फेब्रुवारी, २००९

मला एकदा



मला एकदा मोगरयाचे फुल बनायचयं
गजरा होऊन तिच्या
वेणीत स्वतःला माळुन घ्यायचयं


मला एकदा झुळुक बनायचयं
गालाशी चाळा करणाऱ्या तिच्या
बटांना हळुच मागे सारायचयं

मला एकदा पाणी बनायचयं
तिच्या डोळयांच्या पापणीतुन
हळुच गालावर ओघळायचयं


मला एकदा मेघ बनायचयं
अचानक बरसुन तिला
अगदी चिंब भिजवायचयं

मला एकदा आरसा बनायचयं
तिला माझ्यात पाहताना
डोळॆ भरुन न्याहाळयचयं

मला एकदा सावली बनायचीय
आयुष्याभरासाठी तिला
साथ-सोबत करायचीयं



मीलन

वैशाख वणवा मी मी म्हणतं होता
धरित्रीच्या अंगाची काहिली वाढवतं होता
पशु-पक्षी झाडे,पाने सारेच होते त्रस्त
वरुणाराजाची करुणा भाकण्यात व्यस्त

आणि एक दिवस अचानक
वारा सगळ्यांना सांगत सुटला
सूर्य ही आडुन आडुन पाहु लागला
आसुसली धरती, न कण-कण मोहरला

ढगांच्या काळ्या रथात बसुन
विजेच्या रोषणाई, मेघांच्या वाजंत्रीसहित
आगमला वरुणराज,बरसला तो
सुखावली धरितीची गात्रं न गात्रं

पसरला सुगंध आसमंतात
ल्यायली ती एक नवा साज
सुखावले सारे , गेले विसावुनी
अंकुरले बीज तिच्या कुशीतुनी...

सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

ती समोर असली की

















ती समोर असली की
शब्द पाठमोरे होतात
सांगायचे खुप असले
तरी दिसेनासे होतात


पण आज मी ठरवले होते
तिला सर्व काही सांगायचेच
वेडया ह्या माझ्या मनाला
तिच्यासमोर मांडायचेचं


हसु नको पण मी
आरशासमोर राहुन तयारी ही केली होती
सुरुवात नि शेवट ची
पुन्हा पुन्हा उजळणी केली होती


सगळं काही आठवत असुन ही
मी गप्पच होतो
तिच्या जोरानं हालवण्याने
भानावर आलो होतो


ती माझ्याकडे बघत राहिली
न मी तिच्यात हरवलो
खोटं नाही बोलणार मी
पण पुन्हा सर्व विसरलो


ती च मग बोलली
निरव शांतता मोडत
तुझ्या मनात काय आहे
मला नाही का ते कळत???


तुझ्या मनातलं मी
कधीच वाचलं होतं
माझं मन ही नकळत
तुझं झालं होतं


मग मात्र मी
घेतला तिचा हाती हात
आयुष्याभरासाठी द्यायची
ठरवली एकमेकांना साथ


आता मात्र मला
सर्व काही आठवले
ती समोर असली तरी
आपसुकच सुचत गेले